रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुराअतिक्रमण हटविण्याविना दुभाजकाचे काम सुरू : नागरिकांची तीव्र नाराजी

अतिक्रमण हटविण्याविना दुभाजकाचे काम सुरू : नागरिकांची तीव्र नाराजी

असिफाबाद–आदिलाबादकडे जाणाऱ्या शहरातील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा (प्रतिनिधी):

शहरातील असिफाबाद व आदिलाबादकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याविना डिव्हायडर उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंचायत समिती ते विश्रामगृह या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सुरू असलेल्या या कामामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

यापूर्वी राजुरा ते गडचांदूर मार्गावर गट्टू लावण्याच्या कामात प्रथम अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून त्यानंतर दुभाजकाचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर काहीच कालावधीत त्या मार्गावर पुन्हा अतिक्रमणे उभी राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिक्रमण हटविण्यात सातत्य नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
सध्या पंचायत समितीपासून असिफाबादकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजकाचे काम सुरू असून, या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, हातगाड्या व तात्पुरत्या बांधकामांचे अतिक्रमण कायम आहे. अतिक्रमण हटविले नसतानाच डिव्हायडरचे काम सुरू केल्याने रस्ता अधिक अरुंद झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे दिसून येते.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचारी ये-जा करतात. मात्र अरुंद झालेल्या रस्त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावरून पोलिसाची तैनाती देखील गायब दिसत आहे
स्थानिक व्यापाऱ्यांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधारातून या मार्गाने जाणे धोकादायक झाले आहे,अतिक्रमण हटविण्याची कारवाई न करता थेट दुभाजकाचे काम सुरू केल्यामुळे ग्राहकांची ये-जा कमी झाली असून व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या मते, कोणतेही विकासकाम हाती घेताना आधी नियोजनबद्ध पद्धतीने दोन्ही बाजूंची अतिक्रमणे पूर्णपणे हटविणे आवश्यक होते. तसेच पूर्वी हटविण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पुन्हा कब्जा होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात येणारी विकासकामे निष्फळ ठरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून वाहतूक सुरळीत करावी, तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी कठोर भूमिका घ्यावी, काम सुरू असताना त्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक ठेवायला पाहिजे तसेच वाहतूक पोलीस द्यावे अशी मागणी राजुरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.