रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home ब्रेकिंग न्यूजराजुऱ्यातील ‘माणुसकीची भिंत’ दुर्लक्षामुळे बनतेय कचरा संकलन केंद्र! नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची मागणी.

राजुऱ्यातील ‘माणुसकीची भिंत’ दुर्लक्षामुळे बनतेय कचरा संकलन केंद्र! नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची मागणी.

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा(तालुका प्रतिनिधी)-

गरजू आणि गरीब नागरिकांना मोफत कपडे उपलब्ध व्हावेत, या उदात्त हेतूने नगर परिषद राजुराच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सध्या दुर्लक्षाचा बळी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मुख्य राज्य महामार्गाला लागून असलेल्या या कपडे संकलन केंद्राची सध्या दुरवस्था झाली असून, या ठिकाणी कपडे जाळणे, कचरा टाकणे आणि अस्वच्छता पसरविण्याचे प्रकार घडत असल्याने या उपक्रमाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
गरजू नागरिकांना उपयोगी पडावेत म्हणून अनेक दानशूर नागरिक अधूनमधून या ठिकाणी जुने व वापरण्यायोग्य कपडे आणून ठेवतात. मात्र, या कपड्यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने तसेच काही जणांकडून या ठिकाणी आग लावून कपडे जाळले जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. कपडे जाळल्यामुळे आगीचा धूर आणि काजळी साचून या ठिकाणी सुंदर व आकर्षक रंगरंगोटी केलेल्या भिंती काळवंडल्या आहेत. परिसरात कपड्यांचे ढीग आणि कचरा साचल्याने माणुसकीच्या या उपक्रमाचे रूपांतर हळूहळू कचरा संकलन केंद्रात होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, मुख्य राज्य महामार्गालगत असलेले हे ठिकाण नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे असून, गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त सामाजिक उपक्रम म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. मात्र, योग्य देखभाल, स्वच्छता आणि नियंत्रणाअभावी या उपक्रमाची प्रतिमा मलिन होत आहे.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने या ठिकाणाची स्वच्छता करून पुन्हा आकर्षक रंगरंगोटी करावी, कपड्यांच्या संकलनासाठी व वितरणासाठी योग्य व्यवस्था निर्माण करावी, तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आग लावणारे, कचरा टाकणारे आणि सामाजिक उपक्रमाचे विद्रूपीकरण करणाऱ्यांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
गरजूंच्या मदतीसाठी सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम केवळ नावापुरता न राहता पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि गरजूंना आधार देणारा ठरावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि सामान्य नागरिकांकडून होत आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.