रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याबल्लारपूरघरातील मूल सांभाळणे कठीण,१४८ विद्यार्थी कसे सांभाळायचे?

घरातील मूल सांभाळणे कठीण,१४८ विद्यार्थी कसे सांभाळायचे?

शिक्षकअभावी शाळेची दयनीय अवस्था | दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी

by संतोष कुंदोजवार
0 comments

बल्लारपूर(तालुका प्रतिनिधी)-
घरातील दोन मुलं सांभाळणे कठीण जात असताना शाळेतील १४८ मूल संभाळतांना किती त्रास होत असेल अशी कैफियत शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थापूढे मांडत शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
कोठारी गावातील जि. प. प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.शाळेत एकूण १४८ विद्यार्थी शिक्षण घेत असताना केवळ दोनच शिक्षक कार्यरत असल्याने संपूर्ण शाळेची जबाबदारी दोन शिक्षकांवर आली आहे.त्यामुळे वर्गांचे नियोजन,अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अत्यंत कठीण बनले आहे.सदर प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू असून पंचायत समिती बल्लारपूर व शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
नियमांनुसार या शाळेसाठी एक मुख्याध्यापक आणि किमान चार शिक्षकांची आवश्यकता आहे.मात्र प्रत्यक्षात मुख्याध्यापक व एक कंत्राटी निवृत्त शिक्षकांवर शाळा चालवली जात असल्याने वर्ग एकत्र घेण्याची वेळ येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून शिस्त राखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण झाले आहे.
गावातील बहुतेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत.शासनाकडून विविध शैक्षणिक योजना राबवल्या जात असल्या तरी शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्या योजनांचा अपेक्षित फायदा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे“गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी शासन खेळखंडोबा करीत आहे,”परिणामी पालकवर्गत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.आता शैक्षणिक सत्राचे शेवटचे पर्व सुरू असून मागील कित्येक महिन्यापासून अप्पर तहसील असलेल्या गावातील शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या तुटवट्यामुळे शिक्षण क्षेत्राला हरताळ फसण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदन देऊन शिक्षकांची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे अनेकदा आश्वासन देण्यात आले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, ग्रामस्थांचे अखिल गेडाम यांनी प्रशासनाला इशारा देत लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थासह तीव्र आंदोलन करण्याचा मार्ग इशाराही दिला आहे.

“घरातील एक मूल सांभाळणे कठीण असते.मग दोन शिक्षकांनी १४८ विद्यार्थ्यांना कसे सांभाळायचे? प्रशासनाने तातडीने शिक्षक द्यावेत,अन्यथा ग्रामस्थ शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतील.” – अखिल गेडाम,ग्रामस्थ कोठारी

 

“शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी व उपसरपंचानी लक्षात आणून दिला.आता लवकरच शिक्षकाची पूर्तता तातडीने करण्यात येईल.”
धनंजय साळवे,
संवर्ग विकास स.अधिकारी
पं. स.बल्लारपूर

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.