राजुरा (प्रतिनिधी):
राजुरा पोलीस ठाणे परिसरात सुरू असलेल्या पोलिसांच्या नवीन निवासी वसाहतीच्या बांधकामस्थळी काम करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१४ जुलै) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणीचे नाव सविता भिसेन भारती (वय १८) असे असून ती मध्य प्रदेशातील रहिवासी होती. ती आपल्या भाऊजीच्या बहिणीसोबत बांधकामावर मजुरीसाठी राजुरा येथे आली होती.
प्राथमिक माहितीनुसार, राजुरा येथे वास्तव्यास असताना तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याची चर्चा आहे. या संबंधांबाबत घरच्यांची भीती मनात असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगे पुढील तपास करीत आहेत.