Table of Contents
अवैध रेती वाहतूक प्रकरणात कारवाईचे कागदपत्र पाठविण्यासाठी ₹20 हजारांची लाच मागितल्याचा आरोप
राजुरा/भद्रावती | प्रतिनिधी
भद्रावती येथील वनक्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत आणि वनरक्षक संदीप पुंडलिक पारखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूर यांनी ₹20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर अवैध रेती वाहतुकीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ₹20,000 लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत 23 जुलै 2026 रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 27 जुलै 2026 रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी तक्रारदारामार्फत स्वीकारण्यात आलेल्या ₹20 हजारांच्या लाचेसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपी
- कोमल नरसिंगराव घुगलोत (वय 42 वर्षे) – वनपाल, वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती
- संदीप पुंडलिक पारखे (वय 31 वर्षे) – वनरक्षक, वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती
दोन्ही आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिवाकर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिठेवार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच एसीबी चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(स्रोत : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांचे प्रसिद्धीपत्रक)