रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुराराजुरा शासकीय आयटीआयच्या जीर्ण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर.

राजुरा शासकीय आयटीआयच्या जीर्ण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर.

अपघाताची वाट पाहू नका’; स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन अत्याधुनिक इमारतीची मागणी.

by संतोष कुंदोजवार
0 comments

‘अपघाताची वाट पाहू नका’; स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन अत्याधुनिक इमारतीची मागणी

राजुरा : राजुरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या जीर्ण व असुरक्षित इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतीची तातडीने संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून नवीन, आधुनिक व सर्व आवश्यक सुविधांनीयुक्त इमारत मंजूर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार देवरावदादा भोंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अमोल ज. स. राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राजुरा आयटीआय हे तांत्रिक शिक्षण व कौशल्यविकासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, संस्थेच्या विद्यमान इमारतीची अवस्था चिंताजनक असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अनेक वर्गखोल्या, कार्यशाळा व प्रयोगशाळांच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती असून काही ठिकाणी छताला छिद्रे पडली आहेत. पावसाळ्यात पाणी वर्गखोल्यांमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले. भिंतींवर ओलावा, शेवाळ, बुरशी तसेच प्लास्टर निघण्याची स्थिती आहे. काही ठिकाणी फॉल्स सिलिंग तुटल्याने ते कोसळण्याचा धोका असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

विद्युत वायरिंग, लाईट फिटिंग व विद्युत उपकरणांच्या परिसरात ओलावा आणि गळती असल्याने विद्युत अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कार्यशाळांमध्ये धूळ, अस्वच्छता, यंत्रसामग्रीच्या देखभालीचा अभाव तसेच काही ट्रेडमध्ये जुनी अथवा अपुरी यंत्रसामग्री असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

*‘मॉडेल आयटीआय’ करण्याची मागणी*
नवीन इमारतीत आधुनिक कार्यशाळा, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सेमिनार हॉल, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुविधा तसेच अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

रिक्त प्रशिक्षक व तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे भरावीत, आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि स्थानिक उद्योगांशी समन्वय साधून कॅम्पस प्लेसमेंटची व्यवस्था मजबूत करावी, अशीही मागणी आहे. राजुरा आयटीआयचा ‘मॉडेल आयटीआय’ म्हणून विकास करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी आदित्य भाके, जिल्हा उपाध्यक्ष; जहीर खान, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग; संतोष डेरकर, तालुका अध्यक्ष; रकीब शेख, शहर अध्यक्ष; सतीश कांबळे, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग; राहुल अंबादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने प्रत्यक्ष पाहणी, स्ट्रक्चरल ऑडिट आणि आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.