रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुरासरकारी दुटप्पी धोरणांमुळेच शेतक-याला अखेर किडनी विकावी लागली

सरकारी दुटप्पी धोरणांमुळेच शेतक-याला अखेर किडनी विकावी लागली

ॲड. वामनराव चटप यांचा सरकारवर हल्लाबोल

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा(प्रतिनिधी) –
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे संपुर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आता तर त्याला स्वत:ची किडनी विकून शेतीचे कर्ज फेडावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड तालुकातील मिंथूर येथील रोशन शिवदास कुळे या शेतक-याने शेतीसाठी घेतलेल्या कर्जासाठी आपली किडनी विकल्याची दुर्दैवी घटना घडली असून याबाबत शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी संताप व्यक्त करीत राज्य सरकार वर जोरदार टीका केली आहे.
सरकार शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देत तर नाहीच, शिवाय नेमक्या शेतमाल बाजारात येण्याच्या काळात अनेक देशांकडून विविध शेतमाल अथवा शेतमालजन्य वस्तू आयात करून शेतमालाचे भाव पाडण्याचे पातक करते. दुस-या बाजूला देशात मोठ्या प्रमाणात कापूस, तांदूळ, गहू, सोयाबीन अथवा अन्य शेतमालाचा साठा असतांना निर्यातबंदी करून शेतक-यांना कमी किमतीत शेतमाल विकायला भाग पाडते. सरकार नविन तंत्रज्ञानाचा विरोध करून जास्त उत्पादन घेण्यासाठी होणा-या प्रयत्नांना खिळ घालते. सरकार कुणाचेही असो, सदैव शेतक-यांची लूटच झाली आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी शेतक-यांच्या या दुखण्यावर बोट ठेवून केंद्र सरकार च्या कृषी कृती बलाचा – आयोगाचा अहवाल देऊन शेतक-यांना या गर्तेतून बाहेर काढण्याचा उपाय सांगितला, मात्र शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या टास्क फोर्स आयोगाच्या तरतुदी स्विकारून सरकारने तो लागू केला नाही. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या सुरू असतांना सरकार क्षुल्लक मदत देऊन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून एका दाण्याचे हजार दाणे करणा-या जगाच्या पोशिंद्या शेतक-यावर किडनी विकण्यासारखी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. याबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी संताप व्यक्त करीत संपुर्ण शेतक-यांनी संघटित होऊन सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करावा, असे आवाहन केले आहे. “शेतकरी तितुका एक एक ” म्हणून सर्व शेतक-यांचे कर्ज संपवून त्यांना कर्जमुक्त करावे, तरच अशा दुर्दैवी घटना होणार नाही, असे मत ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.