बसथांबा अतिक्रमणाच्या विळख्यात; अपघाताचा धोका वाढला.
राजुरा (प्रतिनिधी) :
राजुरा शहरातील पंचायत समिती चौक परिसरात रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे बसची वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बसथांब्याच्या समोरच अतिक्रमण झाल्याने बसचालकांना नियोजित ठिकाणी बस उभी करता येत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच चढ-उतार करावा लागत आहे. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या चौकात वाहतूक सिग्नल कार्यरत असतानाही बसचालकांना सिग्नल झोनमध्येच बस थांबवून प्रवासी चढवावे-उतरवावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो, वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो.
दररोज सकाळी व सायंकाळी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, ग्रामीण भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या बसथांब्यावर गर्दी करतात. मात्र अतिक्रमणामुळे बसला थांबा मिळत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. यामुळे अचानक धावणाऱ्या वाहनांमुळे जीवितहानीची भीती कायम आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर परिषद, पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले असल्याचे सांगितले जाते. मात्र अतिक्रमण हटविण्याबाबत अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांच्या मते बसथांब्याच्या समोरील अतिक्रमण तातडीने हटवून बससाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि नियमित अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणे आवश्यक आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ संयुक्त कारवाई करून बसथांबा अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नागरिक, प्रवासी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेकडून जोर धरत आहे.