रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home ब्रेकिंग न्यूजशासनाच्या पोषण आहाराचे कालबाह्य साहित्य जंगलात फेकले.

शासनाच्या पोषण आहाराचे कालबाह्य साहित्य जंगलात फेकले.

खाल्ल्याने म्हैस दगावली अनेक जनावरे बेपत्ता; जंगली प्राण्यांच्या जीवितालाही धोका.

0 comments

खाल्ल्याने म्हैस दगावली अनेक जनावरे बेपत्ता;
जंगली प्राण्यांच्या जीवितालाही धोका

राजुरा(प्रतिनिधी)-

महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा (आंगणवाडी) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी असलेले कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य जंगल परिसरा लगत बेकायदेशीरपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार राजुरा तालुक्यातील चनाखा येथे उघडकीस आला आहे. हे साहित्य खाल्ल्याने गावातील एक म्हैस दगावल्याची घटना घडली असून, आणखी दोन म्हशींसह काही जनावरे बेपत्ता असल्याने त्यांच्याही मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जंगलातील वन्यजीवांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि आंगणवाडीतील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहारातील कालबाह्य गहू, तांदूळ, चना, खिचडी मिक्स, तिखट, हळद आदी साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून चनाखा गावालगतच्या जंगलातील तलाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी फेकून दिल्याचे आढळून आले. या परिसरात गावातील जनावरे नियमितपणे चरायला जातात. गेल्या दोन दिवसांपासून काही म्हशी व इतर जनावरे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तलावाजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य विखुरलेल्या अवस्थेत दिसले. त्याच परिसरात एक म्हैस मृतावस्थेत आढळून आल्याने हे साहित्य खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच मृत जनावराच्या मालकाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चनाखा येथील मारोती वडस्कर यांची एक म्हैस मृतावस्थेत आढळून आली आहे. तर महादेव ठमके यांच्या दोन म्हशी अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय इतर काही ग्रामस्थांची जनावरेही सापडलेली नसल्याने त्यांच्याही मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ज्या तलाव परिसरात कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य फेकण्यात आले आहे, त्या भागात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. हे विषारी व कालबाह्य अन्न वन्यप्राण्यांनी खाल्ल्यास त्यांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो त्यावर वनविभागासाठी उपाययोजना केली जाईल परंतु दोषीवर कारवाई होणे गरजेचे आहे… मारोती चापले नियत वनरक्षक चनाखा.

याबाबतची मला कल्पना नव्हती, असे कृत्य करणे अत्यंत चुकीचे असून तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,
– सौ. एस. डि. रामटेके, सीडीपीओ राजुरा

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.