राजुरा, ता.प्र. –
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने सोमवारी राजुरा येथे भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेकडो विद्यार्थी, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मोर्चाची सुरुवात संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा संविधान चौक, अहिल्यादेवी चौक, आझाद चौक, गांधी चौक आणि नेहरू चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. संपूर्ण मार्गावर आंदोलकांनी शिक्षण बचाव, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील वातावरण आंदोलनमय झाले. या आंदोलनात माजी आमदार ॲड. वामनराव चटप व नगराध्यक्ष अरुण धोटे हे सहभागी झाले.
तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, अधिवक्ते आणि विद्यार्थ्यांनी भाषणे करत शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा कथित खेळ यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक भूमिका व विद्यार्थीकेंद्रित धोरणांना पाठिंबा देत सरकारने शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी वक्त्यांनी केली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व रमेश बिजेकर, अमोल राऊत, ॲड.मारोती कुरवटकर, दिनेश पारखी, रंजन लांडे, बबन उरकुडे, ॲड. अरूण धोटे, गौरव रामटेके, धम्मदीप झाडे, शुभम खैरे, सिद्धार्थ वाघमारे, सुरेंद्र फुसाटे, रोहित जंगमवार, नंदकिशोर वाढई, विश्वास साळवे, शैलेश भरणे, प्रयास कान्हेकर, प्रभाकर गेडाम, हरिदास गौरकर यांनी केले. रॅलीत नरेंद्र काकडे, ॲड. दुर्गे, मधुकर चिंचोलकर, यशोधरा देठे, संगीता करमनकर, रेखा वनकर, मानवी करमनकर, विशाखा साळवे, नाहीद बंदाली, दुर्गा शेंडे, रोशनी टेकाम. स्नेहा जानवे, पुजा महाकुलकर यांचेसह नागवंश युथ फोर्स, जयभिम मित्र मंडळ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गुरुदेव सेवा मंडळ, विदर्भ राज्य आंदोलन समिती, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, युवा आघाडी, प्रोटान संघटना, जमाते ईस्लाम ए हिंद, आफ्रोट संघटना, आदिवासी टायगर सेना, भारतीय बौद्ध महासभा, इंटक संघटना, आयटक संघटना, आझाद फाउंडेशन, नेफडो संघटना, रेडमॅपल कम्प्युटर, गोंडवाना गणतंत्र पार्टी, रावण सेना, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, श्री रविदास चर्मकार फाउंडेशन, स्वराज्य आधार फाउंडेशन, संघर्ष वाहन चालक मालक संघटना इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले.