रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याकोठारीपळसगाव-कोठारी सिमेंट रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ?

पळसगाव-कोठारी सिमेंट रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ?

डांबरी रस्त्यावर सिमेंटिकरन | वर्षभरात तिसऱ्यांदा काम | शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

by संतोष कुंदोजवार
0 comments

डांबरी रस्त्यावर सिमेंटिकरन | वर्षभरात तिसऱ्यांदा काम | शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

बल्हारशाह(तालुका प्रतिनिधी)-

पळसगाव ते कोठारी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मुंबईच्या कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू असून, अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सुरू असलेल्या या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जुन्या डांबरी रस्त्यावरच सिमेंट काँक्रिटीकरण केले जात असल्याने या कामाच्या दर्जावर शंका उपस्थित केली जात असून, संबंधित विभागाच्या अभियंत्याचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.यापूर्वी हा पांदण रस्ता असल्याने काही महिन्यांपूर्वीच २५ ते ३० लाख रुपये खर्च करून खडीकरण करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी याच रस्त्यावर ३० ते ४० लाख रुपयांचा निधी खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत याच रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एकाच रस्त्यावर वारंवार मोठा निधी खर्च करण्याच्या प्रशासकीय निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरील जुना डांबरी थर न काढताच त्यावर काँक्रिटीकरण केले जात असल्याने तांत्रिक निकषांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या टिकाऊपणासाठी
डांबरी रस्त्यावरच काँक्रिटीकरणाचा घाट वर्षभरात तिसऱ्यांदा काम शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष.
आवश्यक असलेली पूर्वतयारी केली जात नसल्याने भविष्यात रस्त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
अंदाजपत्रकानुसार कामात ४० एमएम गिट्टी आणि मुरूम योग्य प्रमाणात पसरवून त्यावर पाणी मारून आवश्यक दबाई (रोलिंग) केली जात नसल्याचा आरोपही होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संबंधित
विभागाचा एकही जबाबदार अधिकारी फिरकत नसून, केवळ कंत्राटदाराच्या मर्जीनुसार काम सुरू आहे. नियमानुसार कामाच्या ठिकाणी मंजूर निधी, लांबी, कंत्राटदाराचे नाव आणि कालावधी दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक असताना, असा कोणताही माहितीफलक जाणीवपूर्वक लावण्यात आलेला नाही.
या मार्गावर प्रामुख्याने शेतकरी, बैलगाड्या, दुचाकी व हलक्या वाहनांची वर्दळ असते. असे असताना कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः कामाची पाहणी करावी, अन्यथा शासकीय निधी पूर्णपणे पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.