रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home राजकारणराजुरा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय द्या! – आमदार देवराव भोंगळे

राजुरा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय द्या! – आमदार देवराव भोंगळे

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी.

by संतोष कुंदोजवार
0 comments

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी.

राजुरा, दि. १२
राजुरा उपविभागासह सीमावर्ती व अतिदुर्गम भागातील हजारो पक्षकारांना आणि नागरिकांना त्वरित, सुलभ व परवडणारा न्याय मिळावा यासाठी राजुरा येथे ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’ तसेच ‘दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय’ तातडीने मंजूर करून सुरू करण्यात यावे, यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन राजुरा विधानसभा मतदारसंघाची गरज, भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा करत तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याचे निवेदन सुपूर्द केले.

राजुरा येथे मागील ६५ ते ७० वर्षांपासून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालय कार्यरत आहे. या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात राजुरा, कोरपना आणि अतिदुर्गम, आकांक्षित जिवती हे तीन तालुके येतात. हा संपूर्ण परिसर नक्षलग्रस्त, तेलंगणा सीमालगतचा आणि बहुतांश गावे ‘पेसा’ (PESA) कायद्यांतर्गत समाविष्ट असलेला आहे. सध्या गंभीर स्वरूपाचे फौजदारी (सेशन केसेस) आणि दिवाणी दाव्यांसाठी येथील जिवती सारख्या तालुक्यातील पक्षकारांना १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चंद्रपूर जिल्हा न्यायालयात चकरा माराव्या लागतात. जिवती व कोरपना तालुक्यांतील सीमालगतच्या भागांतून चंद्रपूरला जाण्यासाठी नियमित दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी, ग्रामीण पक्षकार, महिला आणि वृद्धांना न्यायासाठी चंद्रपूरला जाताना मोठा आर्थिक फटका, वेळेचा अपव्यय व शारीरिक ताण सहन करावा लागतो. वाहनांची सोय नसल्याने अथवा न्यायालयात उशीर झाल्यास नाईलाजाने चंद्रपूर येथेच मुक्काम करावा लागतो.

ऐतिहासिकदृष्ट्या निजाम काळात राजुरा हे मध्यवर्ती केंद्र होते आणि पूर्वी बल्लारपूर न्यायालय देखील राजुरा न्यायालयाच्या अंतर्भूत होते. भौगोलिकदृष्ट्या राजुरा येथून गोंडपिपरी व बल्लारपूर हे तालुके अतिशय जवळ असल्याने राजुरा येथे हे न्यायालय सुरू झाल्यास राजुरा, कोरपना, जिवतीसोबतच गोंडपिपरी व बल्लारपूर परिसरातील पक्षकारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. या बाबी लक्षात घेऊन राजुरा, बल्लारपूर, गोंडपिपरी आणि कोरपना या चारही तालुका बार असोसिएशनने राजुरा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) सुरू करण्याबाबत एकमुखाने ठराव मंजूर करून पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

विशेष म्हणजे राजुरा येथे न्यायालयासाठी सर्व सोयींनी युक्त अशी भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारत आधीपासूनच उपलब्ध असून न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासासाठी सुसज्ज शासकीय निवासस्थाने (क्वार्टर्स) देखील तयार आहेत. त्यामुळे या न्यायालयासाठी शासनाला नवीन इमारतीवर कोणताही अतिरिक्त निधी खर्च करावा लागणार नाही. सर्व निकष आणि पायाभूत सुविधा आधीपासूनच उपलब्ध असल्याने सीमावर्ती व आदिवासी भागातील जनतेच्या सोयीसाठी विशेष बाब म्हणून या न्यायालयाला तात्काळ मंजुरी देऊन संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.