राजुरा २१ डिसेंबर
राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या नगर विकास आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत नगरपरिषद ताब्यात घेतली आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधेश्याम लक्ष्मीनारायण अडाणीया यांचा २७३३ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अरुण धोटे यांना ९०११ मते मिळाली, तर राधेश्याम अडाणीया यांना ६२७८ मते मिळाली.
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही बहुतांश प्रभागांत काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीने यश मिळवले. नगर विकास आघाडी १६ जागांवर विजयी, भाजपा ४ जागांवर तर १ अपक्ष नगरसेवक निवडून आले. प्रभाग क्रमांक १ मध्ये स्वप्निल मोहुर्ले व मयुरी पानपट्टे विजयी झाले. प्रभाग क्रमांक २ मध्ये सिद्धार्थ पथाडे व मंगला मोकडे यांनी बाजी मारली. प्रभाग ३ मध्ये पौर्णिमा सोयाम व ईश्र्वर (गोलू ) ठाकरे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नीता बानकर व अमोल चिल्लावार विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये भूपेश मेश्राम व फरीना शेख यांनी यश संपादन केले. प्रभाग ६ मध्ये इंदुताई निकोडे व रमेश नळे विजयी झाले. प्रभाग ७ मध्ये पूनम गिरसावळे , प्रफुल्ल कावळे यांनी विजय मिळवला. प्रभाग ८ मध्ये वज्रमाला बतकमवार व दिलीप देरकर विजयी झाले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनंता ताजने, संध्या चांदेकर व अन्नू हरजीतसिंग संधू यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १० मध्ये गीता पथाडे विजयी ठरल्या, तर भारत रोहणे व जुबेर शेख यांच्यात समान मते झाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे जुबेर शेख विजयी ठरले.
या निकालानंतर शहरात काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत कौल दिल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकां समोर आता शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे.
कोट–
- अरूण धोटे हे नगर विकास आघाडीकडून दुस-यांदा तर एकुण चौथ्यांदा अध्यक्ष पदावर विजयी झाले.
- राजुरा नगरपालिका निवडणूकीत सिध्दार्थ पथाडे आणि गीताताई पथाडे हे पती – पत्नी निवडून आले.
- जुबेर शेख हे शेतकरी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते मात्र त्यांना नगर विकास आघाडीत तिकीट मिळाले नव्हते. त्यांनी अपक्ष उभे राहून ईश्वर चिठ्ठीवर विजय मिळविला. मात्र विजयी होताच माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
- या निवडणूकीत भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट व महिला शहराध्यक्ष मायाताई धोटे पराभूत झाल्या