प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

कोरपना :

एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहणारे अनेक असतात; मात्र त्यामागचे कारण शोधण्याची जिज्ञासा असणारेच इतिहास घडवतात. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनात जिद्द असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. प्रश्न विचारण्याची सवय, विचार करण्याची क्षमता आणि ध्येयासाठी संघर्ष करण्याची तयारी या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी कोरपन्यातील विद्यार्थ्यांना दिला.

स्टुडंट फोरम ग्रुपच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी न्यूटनच्या सफरचंदाचा दाखला देत जिज्ञासेचे सामर्थ्य स्पष्ट केले. झाडावरून सफरचंद पडताना अनेकांनी पाहिले; परंतु ते खालीच का पडते, हा प्रश्न न्यूटनने विचारला आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध लागला. एखादी घटना पाहण्यापेक्षा तिच्यामागील कारण शोधण्याची वृत्ती महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर करणारे न बनता प्रश्न विचारणारे आणि नवनिर्मितीचा ध्यास घेणारे बनावे, असे त्यांनी सांगितले.

यशस्वी होण्यासाठी माणसांची मानसिकता कशी असते, याचे विश्लेषण करताना त्यांनी चार प्रकारच्या वृत्ती स्पष्ट केल्या. काही लोक ‘हे होणार नाही’, असे म्हणत प्रयत्न करण्यापूर्वीच माघार घेतात. काही जण ‘मला भेटणार नाही’, असे समजून संधीपासून दूर राहतात. काहींची भूमिका ‘मी करणारच नाही’, अशी नकारात्मक असते. मात्र चौथ्या प्रकारची माणसे ‘हे होईलच’, असा ठाम विश्वास ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यश मिळवायचे असेल तर चौथ्या प्रकारची जिद्दी मानसिकता अंगीकारली पाहिजे, असा प्रेरणादायी कानमंत्र त्यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत त्यांनी इतिहासातील नियोजन, धाडस, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला. श्रीशैलम तसेच दक्षिण भारतातील ऐतिहासिक मंदिरांचे स्थापत्यवैभव आणि गोपुरांच्या संदर्भातून इतिहास समजून घेण्याची नवी दृष्टी त्यांनी श्रोत्यांना दिली. इतिहास हा केवळ वाचण्याचा विषय नसून त्यातून वर्तमानासाठी प्रेरणा घेण्याचे माध्यम आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले.

अपयश आले म्हणून थांबू नका, परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःची क्षमता ओळखा आणि ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका किरण देरकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, आबिद अली, किशोर बावणे, शिवव्याख्याते अमर लेनगुरे, विक्रांत सहारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोरपना तालुका रत्न पुरस्काराने जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर, तर कोरपना तालुका शिक्षण महर्षी पुरस्काराने इंजिनिअर दिलीप झाडे यांना गौरविण्यात आले. शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीसाठी स्टुडंट फोरम ग्रुप गेल्या १२ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीची नवी ऊर्जा निर्माण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल देरकर, संचालन जगदीश भगत यांनी केले, तर आभार दीपक पारखी यांनी मानले.

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई

25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्राचार्य सह लिपीक ताब्यात | पोंभुरणा ITI मधील घटना