राजुरा (प्रतिनिधी) –
‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विहिरगाव येथील साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावालगतच्या बारमाही नाल्यावर वनराई बंधारा उभारून जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम राबवला.
या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्यास मदत होणार असून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे.
उपक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे” असा मौलिक संदेश दिला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने असे उपक्रम काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या यशस्वी उपक्रमाचा समारोप वनभोजनाने करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच नीलकंठ खेळेकर, प्राचार्य गणेश लोहे, प्राध्यापक नळे, बोभाटे, लिपिक वांढरे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे गावात जलसंवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून सर्वत्र कौतुक होत आहे.