राजुरा:
वेकोलीतून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कोळशाचा ढेला चालत्या चारचाकी वाहनावर कोसळला. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वेकोलीची कोळसा वाहतूक तब्बल दोन तास रोखून धरली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोवरी गावाजवळ घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत.या कोळसा खाणीतून दिवसरात्र कोळशाची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे आपल्या (एम. एच.३४ सी.आर -९९७९) या चारचाकी वाहनाने गोवरी गावाकडे जात असताना वेकोलीतून ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकमधून कोळशाचा ढेला थेट चारचाकी वाहनावर कोसळल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांचे नेतृत्वात तब्बल २ तास कोळसा वाहतून रोखून धरली. वेकोलीने ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी करीत वेकोली विरोधात गावकरी संतप्त झाले. त्यामुळे राजुरा – गोवरी या मुख्य मार्गावर दोनही बाजूने २ किमी पर्यंत ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप पसरला असून ओव्हरलोड आणि अनियंत्रित कोळसा वाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीही अनेकदा तक्रारी करूनही वेकोली प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वेकोलीतून ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे अशा प्रकारच्या अपघातात दिवसेवदिवस वाढ होत आहे.त्यामुळे वेकोलीने ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करावी तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आरटीओ विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोळशाची वाहतूक ठरतेय अपघातास कारणीभूत…..राजुरा गोवरी कवठाळा या मुख्य मार्गावरील वेकोलीची ओव्हरलोड कोळसा वाहतूक दिवसरात्र सुरू असते. अशाच एका अज्ञात ट्रकने १५ दिवसापूर्वी चिंचोली खुर्द येथील सुधाकर उलमाले या वेकोलि कर्मचाऱ्याचा अपघातात रामपूर जंगलातील वळणावर अपघाती मृत्यू झाला होता.त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी सबंधित विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.