राजुरा,(तालुका प्रतिनिधी) –
तेलंगणा राज्यसीमेला लागून असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम, डोंगराळ जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे उर्वरित बांधकाम (पहिला माळा) तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाच्या टप्पा-३ अंतर्गत तब्बल २१ कोटी ५१ लाख ९४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
जिवतीसारख्या दुर्गम व आकांक्षित भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना उपचारासाठी दूरवर प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी पहिल्या विधिमंडळ अधिवेशनापासूनच या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले, तसेच मंत्रालयात अनेकदा उच्चस्तरीय बैठका ही घेतल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन सातत्याने मागणीचा पाठपुरावा केला
शासनाने मंजूर केलेल्या या २१.५२ कोटी रुपयांच्या निधीतून जिवती ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याचे तब्बल १९५५.१९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे भव्य बांधकाम केले जाणार आहे. या अत्याधुनिक रुग्णालयात लिफ्ट, सेंट्रल एसी सिस्टीम (HVAC), ऑक्सिजन पाइपलाइन, फायर फायटिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरनेट, सौर ऊर्जा यंत्रणा, आधुनिक वैद्यकीय फर्निचर आणि भव्य कम्पाऊंड वॉल यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध असतील. यासोबतच, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय परिसरात टाईप-२ आणि टाईप-४ दर्जाची प्रशस्त निवासस्थाने उभारली जाणार आहेत.
आमदार देवराव भोंगळे यांच्या या प्रयत्नांमुळे अतिदुर्गम भागातील हजारो नागरिकांना आता आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या निर्णयाबद्दल जिवती तालुक्यातील नागरिकांकडून आमदार देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.