राजुरातील पोलीस श्वान पथक चंद्रपुरात! राजुरा उपविभागात गुन्हे शोध मोहिमेला अडथळा; १२ कर्मचारी आणि ५ श्वान असलेल्या पथकाची उणीव ?

राजुरा (प्रतिनिधी) :

राजुरा पोलीस उपविभागातील गुन्हे तपास आणि शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस विभागाचे श्वान पथक चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याने परिसरातील पोलीस यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे राजुरा उपविभागात गुन्हे शोधण्याच्या कामात विलंब होत आहे.

राजुरा पोलीस उपविभाग हा अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या परिसरात विविध औद्योगिक प्रकल्प व उद्योगधंदे असल्याने गुन्हेगारी घटनांच्या तपासाला विशेष महत्त्व आहे. चोरी, घरफोडी, खून तसेच इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घटनास्थळावरील पुरावे शोधणे आणि आरोपींचा माग काढणे यासाठी श्वान पथकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
राजुरा येथील या श्वान पथकात १२ कर्मचारी आणि ५ प्रशिक्षित श्वानांचा समावेश होता. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी तातडीने पोहोचून घटनास्थळाची पाहणी करणे, संशयितांचा माग काढणे आणि तपासाला दिशा देण्यासाठी हे पथक पोलिसांना मदत करीत होते.
मात्र, हे पथक चंद्रपूर येथे 3 वर्षांपूर्वी हलविण्यात आल्याने राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना परिसरातील गुन्हे तपासाच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर श्वान पथकाला चंद्रपूरवरून बोलावावे लागणार असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परिणामी महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची किंवा तपासाच्या दृष्टीने वेळेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नक्षलग्रस्त आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राजुरा उपविभागासाठी श्वान पथकाची उपलब्धता ही केवळ प्रशासकीय गरज नसून प्रभावी पोलीस तपासाच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. त्यामुळे हे पथक पुन्हा राजुरा येथे कार्यरत करावे किंवा राजुरा उपविभागासाठी स्वतंत्र श्वान पथकाची व्यवस्था करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
श्वान पथकाच्या अनुपस्थितीत गुन्हे शोध मोहिमेवर होणारा परिणाम लक्षात घेता, पोलीस प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र