कोरपना –
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड हानी झाली.
या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका २५ वर्षीय युवक आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला असून, नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
वादळ दरम्यान शेरज बूज येथील शेतशिवारात असलेल्या संयोग चंद्रकांत लोडे (२५) या युवकाच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंदपूर येथे शेतात बांधून असलेल्या विकास वामन खडसे यांच्या मालकीच्या बैलावरही वीज कोसळली. यात हा बैल जागीच दगावला. एका उमद्या युवकाच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या वादळाचा कोरपना तालुक्यातील
कोरपना, कन्हाळगाव, अकोला, पारडी, शेरज बूज, माथा, धोपटाळा, मांडवा, वनसडी, कोडशी बूज, कोडशी खुर्द, गोविंदपुर, रायपूर, मांडवा, खैरगाव, हेटी,गांधीनगर, तांबाडी, तुकडोजीनगर, पिंपरी, मेहंदी, चनई बूज, चनई खुर्द,पांडूगुडा, चोपण, जेवरा, खडकी, रूपापेठ आदी गावांना मोठा फटका बसला
वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक गावांमधील घरांची टिन पत्रे , शेतशिवारातील शेड हवेत उडून गेली. त्यामुळे तेथे ठेवलेले शेती उपयोगी साहित्य , खते ,अन्नधान्य , संसारोपयोगी साहित्याची मोठी नासधूस झाली आहे. अनेक नागरिक उघड्यावर आले असून, घर कोसळल्याने व पत्रे लागल्याने काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
तसेच, रस्त्यांवर आणि गावांमध्ये मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्यामुळे व तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये महावितरण कंपनीचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.याचबरोबर फुटपाथ विक्रेते , व्यावसायिक , लग्नसमारंभ आदीची वादळामुळे मोठी तारांबळ उडाली.
अकोला व पारडी येथे सर्वाधिक नुकसान
वादळी वाऱ्यामुळे अकोला व पारडी या गावात सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले गेले. झालेल्या नुकसानामुळे त्यांना रात्र उघड्यावरच काढावी लागली.
आपतग्रस्त गावांना आमदारांची भेट
घटनेची माहिती मिळताच आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने आपतग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी बाधित नागरिकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि परिस्थितीची पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य ती मदत पुरवण्यासाठी आणि पंचनामे करण्याचे निर्देश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.