कोरपना –
ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळवू शकते, हे कोरपना तालुक्यातील हेटी गावातील दोन सख्या बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. जयश्री मारोती बुच्चे आणि भाग्यश्री मारोती बुच्चे या दोन्ही जुळ्या बहिणींची पोलिस दलात निवड झाली असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापैकी जयश्रीची नागपूर शहर पोलिस दलात तर भाग्यश्रीची चंद्रपूर पोलिस दलात निवड झाली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या दोन्ही बहिणींनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळवले. विशेष म्हणजे, दोघींचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या बहिणींनी मर्यादित साधनसामग्रीतूनही मोठे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवले.
हेटीसारख्या छोट्याशा गावात विशेष प्रशिक्षण सुविधा, महागडे क्लासेस किंवा आधुनिक साधनांचा अभाव असतानाही त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर अभ्यास आणि शारीरिक सराव सुरू ठेवला. दररोज नियमित धावणे, मैदानी सराव, लेखी परीक्षेची तयारी आणि मानसिक चिकाटी यामुळे त्यांनी यशाचे शिखर गाठले.
जयश्री आणि भाग्यश्री यांच्या यशामुळे गावातील इतर मुलींनाही नवी प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी या दोघी आदर्श ठरत असून “मोठे स्वप्न पाहण्यासाठी मोठ्या शहराची गरज नसते, तर मोठ्या जिद्दीची गरज असते,” हा संदेश त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दिला आहे.
दोन्ही मुलींच्या यशामुळे हेटी गावात आनंदाचे वातावरण असून, गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी त्यांच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले. शेतकरी कुटुंबातील या लेकींनी मिळवलेले यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोरपना तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.